आशियाई स्पर्धेला मीराबाई मुकणार?

वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू ही आगामी आशियाई स्पर्धेला मुकणार असल्याची शक्यता भारताचे प्रमुख प्रशिक्षक विजय शर्मा यांनी वर्तवली आहे. मीराबाई चानूने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेला पात्र ठरण्याचे लक्ष्य बाळगले आहे. त्यामुळे ती आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार करीत आहे.

मे महिन्यापासून मीराबाई पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. ती अजूनही यातून पूर्णपणे सावरलेली नाही. याबाबत विजय शर्मा म्हणाले, ‘वेटलिफ्टिंग फेडरेशनला मी अहवाल सादर केला आहे. आता तिच्याबाबतचा निर्णय फेडरेशनच घेईन. आशियाई स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी आहे. अशा स्थितीत मीराबाईने जड वजन उचलणे योग्य नाही. त्याचा परिणाम तिच्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेवर होऊ शकतो. सरतेशेवटी आशियाई स्पर्धेपेक्षा ऑलिंपिक स्पर्धा महत्त्वाची आहे.’ नोव्हेंबरमध्ये अश्गाबात येथे वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा होत आहे. ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच स्पर्धा आहे. विजय शर्मा म्हणाले, ‘मिराबाई सध्या फेडरेशनच्या संपर्कात आहे. सध्या तरी ती ठिक आहे. पण, काल सराव करताना तिला अचानक त्रास व्हायला लागला. त्यामुळे तिला सराव थांबवावा लागला.’ तिला नेमका काय त्रास होत आहे, हे अद्याप डॉक्टरांच्या निदर्शनास आलेले नसल्याचे शर्मा यांनी सांगितले. मिराबाईच्या समावेशाचा अंतिम निर्णय गुरुवारी होणार असल्याचे फेडरेशनचे सचिव सहदेव यादव यांनी सांगितले. जकार्ता आशियाई स्पर्धेत मिराबाईकडून सुवर्णपदकाच्या आशा होत्या. मात्र, भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नोव्हेंबर २०१७मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत मणिपूरच्या मिराबाईने ४८ किलो गटात सुवर्णपदक मिळवले. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत २२ वर्षांनंतर भारताच्या वेटलिफ्टरने सुवर्णपदक मिळवले. एप्रिलमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने विक्रमी १९६ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*