खेळाडूंना नोकरीचा सुखद धक्का

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३३ खेळाडूंना थेट नोकरी देण्याचा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. आगामी काळात राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे खेळाडू आपला ठसा उमटवताना दिसतील. तसेच क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी खेळाडू कठोर मेहनत घेतील, अशी प्रतिक्रिया खेळाडू व क्रीडा संघटकांनी व्यक्त केली आहे.

औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय तलवारबाजपटू स्वप्नील तांगडे, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टपटू सिद्धार्थ कदम आणि आनंद थोरात या शि‌वछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंना थेट नोकरीचा सुखद धक्का मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ‘मटा’शी संवाद साधताना सिद्धार्थ कदम म्हणाला, ‘खेळाडूंना थेट नोकरी देण्याचा शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. खेळून काय पोट भरणार आहे का असे अनेक वर्षांपासून कानावर सारखे पडत असायचे. परंतु, आता खेळात दर्जेदार कामगिरी झाली तर हमखास नोकरी मिळते असे अभिमानाने सांगता येईल. आता पालक आपल्या मुला-मुलींना खेळण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देतील. एक खेळाडू जवळपास दोन दशके मैदानावर घाम गाळतो. त्याच्यासमोर नोकरीचा प्रश्न असतोच. पण आता हा प्रश्न त्याला भेडसावणार नाही. खेळातील कामगिरी, शैक्षणिक प्रगती आणि क्रीडा पुरस्कार हे नोकरी मिळण्यासाठी निश्चितच उपयोगी पडतील. साहजिकच आता खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल आणि खेळासाठी ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे.’

‘शासनाने मला थेट नोकरी दिल्याचा खूप खूप आनंद आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक विजेता खेळाडू घडवणे तसेच ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू घडवणे हे माझे टार्गेट होते. नोकरीमुळे आता माझे टार्गेट गाठण्यासाठी मला स्फूर्ती मिळाली आहे. नोकरीमुळे एक नवी ऊर्जा मिळाली आहे. आता खेळाडूंची संख्या निश्चितच वाढेल. सध्या मी एमपीएड करीत होतो. तसेच विभागीय क्रीडा संकुलात नवोदित खेळाडूंना तलवारबाजीचे प्रशिक्षण देत होते. नोकरीचा सुखद धक्का मुख्यमंत्र्यांनी दिला. आयुष्यभर हा गोड धक्का माझ्या स्मरणात राहिल, असे स्वप्नील तांगडे याने सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*