नदालची वॉवरिन्कावर मात

पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास पाउण तास लढतीत व्यत्यय आला; पण यामुळे रफाएल नदालच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. त्याने स्टॅन वॉवरिन्कावर ७-५, ७-६ (७-४) असा विजय मिळवून टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. झुंजीचा पहिला सेट ६३ मिनिटे रंगला होता. वॉवरिन्काने नदालने मिळवलेला सेट पॉईंट उधळून लावत सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी साधली. नदालने सर्व्हिस राखून ६-५ अशी आघाडी घेतली. यानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आला.

पाउस थांबल्यानंतर नदालने वॉवरिन्काची सर्व्हिस मोडून सेट खिशात घातला. दुसरा सेटही चुरशीचा झाला. तीन ग्रँडस्लॅम जेतेपदांचा अनुभव गाठीशी असलेल्या वॉवरिन्काने सुरुवातीलाच नदालची सर्व्हिस मोडून २-१ अशी आघाडी घेतली. ही पिछाडी भरून काढत नदालने विजयाची नोंद केली. दरम्यान झ्वेरेव्हने रशियाच्या दानील मेदव्हेदेव्हवर ६-३, ६-२ अशी सरशी साधली. ५२ मिनिटांच्या लढतीत त्याने एकदाही प्रतिस्पर्ध्याला ब्रेकची संधी दिली नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*