संगीताच्या प्रयोगशाळेची सफर

‘‘तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही’’… गेलेल्या माणसाची सय जागवताना असं सर्रास म्हटलं जातं. अर्थात, ते खरं फार थोड्या लोकांच्या बाबतीत ठरतं. राहुल देव बर्मन तथा आर. डी. बर्मन ऊर्फ पंचमदा हे अशा थोड्या लोकांपैकीच एक. संगीत ऐकण्यासाठी म्हणून रेडिओ, टीव्ही, एफएम, मोबाइल कशाचाही ‘स्वीच ऑन’ करा. हा माणूस तुम्हाला भेटणारच. इतकं त्यानं कानसेनांचं भावविश्व व्यापून टाकलंय. पंचमदांना जाऊन २३ वर्षे झाली. पण त्याच्या स्मृती पुसट होण्याऐवजी अधिक गडद होत चालल्यात. पंचमदा आणि त्यांच्या संगीतावर आधारित जवळपास ३ हजार कार्यक्रम वर्षाकाठी होतात. त्यांच्यावर अनेक पुस्तकं लिहिली जाताहेत. पंचम नावाची जादू नेमकी काय होती, हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘मॅजिकल पंचम’ हा असाच एक प्रयत्न. पंचमदांच्या गाण्यावर कार्यक्रम करणाऱ्या ‘स्वरदा कम्युनिकेशन्स आणि इव्हेंट्स’नं हा प्रयत्न केलाय आणि तो पंचमदांच्या संगीताइतकाच सुरेल आणि सुरेख झालाय. पंचमदांचे समकालीन संगीतकार, त्यांच्या सोबत काम केलेले वादक, गायक, त्यांचे कट्टर चाहते या सर्वांनी सांगितलेल्या आठवणींचा कोलाज म्हणजे हे पुस्तक. पंचमदांचं सांगितीक आयुष्य त्यांच्या वैयक्तिक जीवनापेक्षा वेगळं नव्हतंच. त्यामुळं रुढार्थानं हे आत्मचरित्र नसलं तरी ते तसं भासतं. पंचमदांच्या संगीताची चर्चा करताना त्यांच्या स्वभावाचे अनेकविध पैलू आपसूकच समोर येतात. शिवाय, पंचमदांबाबत सर्वांचे अनुभव जवळपास सारखेच असल्यानं हे सगळं प्रामाणिकही होऊन जातं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*