हे आनंदी गाणे…

मध्यंतरी अगदी सकाळी सकाळी सीमाचा फोन आला. नेहमीसारखाच उत्साहानं थबथबलेला आवाज.. म्हणाली, ‘तुला पेढे द्यायचे आहेत. केव्हा येऊ ते सांग.’ मी तिला थांबवत म्हणालो, ‘कशासाठी, ते तर सांग… नाही, नाही.. आत्ता नाही. पेढ्याचे कारण पेढ्याबरोबरच.’ एखाद्या लहान मुलीसारखा सीमाचा हा नेहेमीचा खेळ. मग रविवारी संध्याकाळी छानदार, कंदी पेढे आले. सोबत उत्साह आणि आनंदाचा लोळ घरात शिरला. सीमा म्हणाली, “अरे, माझ्या परीक्षेचा निकाल लागलाय. मी एमए झाले आता. पहिल्या वर्गात.”

सीमानं बँकेतून मुदतपूर्व निवृत्ती घेतल्यानंतर तिच्या मनात नवीन काहीतरी शिकण्याचं घोळतंय, हे सगळ्या मित्रमैत्रिणींच्या कानावर होतं. रिकामपण आल्यानं सीमानं डोक्यात घेतलेलं हे खूळ काही दिवसांनी आपोआप जाईल, असाही अनेकांचा होरा होता. पण सीमानं मात्र काही न बोलता तिच्या आवडीच्या इतिहासाचा अभ्यास जोमानं सुरू केला होता. नंतर तिनं सरळ एमएला प्रवेशच घेऊन टाकला आणि ती नियमित तासांनाही जाऊ लागली. आता तर तिला फर्स्ट क्लास मिळाला होता आणि दोन बक्षिसंही…

बक्षिसांचा आनंद तिला होताच, पण आपल्याला दोन वर्षं खूप नवं शिकायला मिळालं, वाचायला मिळालं, अभ्यास सहलींमधून नवं जग पाहता आलं, याचा आनंद सीमाच्या शब्दाशब्दांतून पाझरत होता. तिच्या वर्गातल्या तरुण मुलामुलींशी तिची गट्टी जमली होती. सीमाचं घर म्हणजे, या मुलामुलींचा अड्डाच बनला होता. तीही या मुलांशी दोस्ती करत त्यांच्यातलीच एक बनून गेली होती. त्यांच्याबरोबर ती रमत होती. हिरिरीनं अभ्यासही करत होती

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*