भाजप, साई पक्षाचा व्हीप जारी

महापौरपदाच्या वादावरून सध्या सत्ताधारी भाजप, ओमी कलानी चमू आणि साई पक्ष यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे. म्हणूनच विषय समितींच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप आणि साई पक्षाने व्हीप जारी केला आहे. साई पक्षाकडून ओमी चमूला विरोध होत असल्याने ओमी चमूनेही सावध भूमिका घेतली आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या विशेष समित्यांच्या ९ सभापतींची निवडणूक मंगळवारी पार पडणार आहे. यात पाणीपुरवठा, आरोग्य, माध्यमिक शिक्षण, गलिच्छ वस्ती निर्मूलन, क्रीडा, समाजकल्याण, महिला आणि बालकल्याण, महसूल या सभापतींची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप-साई पक्ष- टीम ओमी कलानी आणि विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाइंने उमेदवारी जाहीर केली. महापौरपदावरून भाजप- ओमी कलानी चमू – साई पक्ष यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू आहे.

महापौर मीना आयलानी यांनी सव्वा वर्ष झाल्यानंतर राजीनामा द्यावा आणि पुढील महापौरपद पंचम कलानी यांना द्यावे, असे ओमी कलानी चमूची मागणी आहे. मात्र भाजपच्या महापौर मीना आयलानी यांच्याकडून राजीनाम्याच्या कसल्याही हालचाली नाहीत. दुसरीकडे पंचम कलानी यांना साई पक्षातून विरोध केला जात आहे. या राजकीय हालचाली पाहता ओमी कलानी चमूचे अध्यक्ष ओमी कलानी यांनी विषय समितीच्या निवडणुकीत भाजपच्या मीना आयलानी यांचे समर्थक आणि साई पक्षाचे उमेदवार यांना सहकार्य करणार नसल्याचा इशारा दिला आहे. यानंतर ओमी कलानी चमू आणि शिवसेना हातमिळवणीदेखील करण्याची शक्यता आहे. या राजकीय हालचालीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून भाजप आणि साई पक्षाने नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे.

याबाबत ओमी कलानी यांना विचारले असता, साई पक्ष आम्हाला महापौरपदासाठी सहकार्य करत नसल्याने, आजच्या निवडणुकीत आम्हीही त्यांना मदत करणार नसल्याची भूमिका घेण्याचा विचार करत आहोत. याबाबत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी उशिरा चर्चा केल्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहोत. महापौरपदाबाबत आम्हाला साई पक्षाने मदत करण्याचे आश्वासन दिले, तर आम्ही त्यांना सभापतीपदाच्या निवडणुकीत मदत करू, असे त्यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*