सनातन संस्था, भिडेंना राजाश्रय

राज्यातील घातपाताच्या घटनांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग समोर आला आहे. असे असूनही शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे आणि सनातन संस्थेला राजाश्रय मिळत असल्याचा गंभीर दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केला आहे. राज्यात सापडलेली स्फोटके ही फटाके आहेत का? असा सवाल करीत या प्रकरणात सनातन सोबत अनेक संघटना ही दडलेल्या असून, त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

जिल्हा दौऱ्यावर आलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की केंद्र व राज्यातील भाजप सरकारकडून कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यासाठी ‘मोदी हटाव-संविधान बचाव’ हा नारा देत देशात महाआघाडी केली जाणार असून, यात शिवसेना नसणार असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकार सर्वाधिक भ्रष्ट आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा भाजपने केलेला दावा फोल ठरला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गाला प्राधान्य दिले जात आहे. कर्जमाफीत मोठा घोटाळा झाला आहे. राफेल प्रकरणात ३६ कोटींचा घोटाळा झाला आहे. मात्र त्यावर केंद्र सरकार गप्प असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षण हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. आघाडी सरकारने आरक्षण दिले होते मात्र भाजप सरकारला हे आरक्षण टिकविता आलेले नाही. आरक्षणाबाबत त्यांची भूमिका फसवाफसवीचे आहे. विरोधकांना विश्वासत घेतले जात नाही. त्यामुळे आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस काहीही सांगितले जात नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारची भूमिक संदिग्ध असल्याने ते रस्त्यावर उतरले आहेत. मराठा आरक्षण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेस आमदार डॉ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष शरद आहेर, संपतराव सकाळे, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, डॉ. तुषार शेवाळे, राहुल दिवे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील आव्हाड, भारत टाकेकर आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*