मुंबईत २०,००० खड्डे? विश्वविक्रमासाठी अर्ज

देशाची औद्योगिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये २०,०० हून जास्त खड्डे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरपीआय नेते नवीन लाडे यांनी मुंबईतील खड्ड्यांची माहिती गोळा केली असून सर्वात जास्त खड्डे असलेलं शहर म्हणून मुंबईच्या नावे विश्वविक्रम नोंदवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

नवीन लाडे यांनी जुलैमध्ये जगात सर्वात जास्त खड्डे असलेलं शहर म्हणून मुंबईच नाव ग्रिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरातील खड्ड्यांची माहिती द्या असं आवाहन सोशल मीडियाच्या मार्फत करण्यात आलं होतं. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून २०,००० हून अधिक खड्ड्यांची माहिती नागरिकांनी पाठवली आहे. या खड्ड्यांची सत्यता तपासण्यासाठी नवीन लाडे यांच्याकडे एक स्वतंत्र टीम आहे. ही टीम दररोज शहरातील विविध भागात जाऊन या खड्ड्यांचे फोटो काढण्यासोबतच परिसरातील इतर माहितीही मिळवते आहे. लाडे यांनी ग्रिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही मुंबईचं नाव नोंदवण्यासाठी पत्र लिहिलं होतं. पण खड्ड्यांचा मुद्दा राजकीय असल्यामुळे त्याची विश्वविक्रम म्हणून नोंद करता येणार नाही असं ग्रिनीस बुकच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. लाडे यांनी लिमका बुककडे देखील अर्ज केला आहे. दरम्यान इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने मुंबईच्या नावे खड्ड्यांचा विक्रम नोंदवायची तयारी दाखवली आहे. यामुळे समाजजागृती होईल आणि प्रशासनावर खड्डे बुजवण्यासाठी दबाव येईल असं मत इंडिया बुकच्या चॅटर्जींनी व्यक्त केलं आहे.

मुंबईत खड्ड्यांमुळे अपघात होऊन शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असूनही प्रशासन ठोस पाऊलं उचलत नाही. त्यामुळे प्रशासनाला जागं करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती नवीन लाडे यांनी दिली आहे. यासाठी मुंबईपॉटहोल्सडॉटकॉम नावाची वेबसाइटही त्यांनी सुरू केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*