वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तरुणाची ओळख पटली

शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘त्या’ तरुणाची ओळख पटली. अभिमन्यू जयसिंग पाटील (वय २२, रा. पहिली गल्ली, उजळाईवाडी, मूळ रा. दोनवडे, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. जुना राजवाडा पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. अपघातातील दुचाकीही पोलिसांनी जप्त केली.

शंकरराव रामचंद्र मोरे (वय ७७, रा. धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर) हे १० जुलै रोजी टिंबर मार्केट येथून घरी जात असताना शिवाजी पेठेतील लाड चौकात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिल्याने गंभीर जखमी झाले होते. संशयित तरुणाने त्यांना एका रिक्षामधून रुग्णालयात न नेता रंकाळ्याजवळील जावळाच्या गणपतीच्या येथील एका बंद दुकानाजवळ सोडून देत त्यांच्या खिशातील पैसेही काढून घेतले होते.

मोरे यांच्यावर वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा १६ जुलैला उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अज्ञात तरुणाचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे असून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता. संशयित तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पैसे काढून घेतल्याने संशयित तरुण सराईत असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी दुचाकीच्या वर्णनावरून १0 तरुणांकडे कसून चौकशी केली होती.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून तो अभिमन्यू पाटील असल्याचे निष्पन्न झाले. घटनेपासून तो पसार झाला होता. पोलिसांनी तो राहत असलेल्या उजळाईवाडी येथील घरी दोनवेळा छापा टाकून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो मिळून आला नव्हता. सोमवारी पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून दुचाकी (एम. एच. ०९ डी. एफ ५७७९) ही ताब्यात घेतली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*