महाराष्ट्र
Trending

मुंबईतील बाबुलनाथ मंदिराच्या जागेचा प्रश्न मार्गी

मुंबईतील गिरगाव जवळील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी असलेल्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याचा दीर्घकाल प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्य सरकारने ही जागा ‘बाबुलनाथ चॅरिटी ट्रस्ट’ला अवघ्या १ रुपया वार्षिक नाममात्र दराने ३० वर्षांसाठी नूतनीकरण करून देण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उभय सभागृहात दिली. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर: बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक असून श्रावण आणि महाशिवरात्रीला लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि मार्गिका या शासकीय लीझवर असल्याने, लीझचे नूतनीकरण वेळेवर न झाल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

मलबार हिलसारख्या महागड्या ठिकाणी असलेल्या या जागेवर बाजारभावानुसार कर भरणे ट्रस्टला अवघड झाले असते. हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. शासनाने आता कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. तो म्हणजे, या जागेचा भाडेपट्टा आता ‘बाबुलनाथ चॅरिटी ट्रस्ट’ला अवघ्या १ रुपया या नाममात्र दराने ३० वर्षांसाठी नूतनीकरण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जागेचा तपशील

मलबार–कंबाला हिल महसूल विभागातील ‘भुकर क्र. ४३५ पार्ट’ या मिळकतीचा हा विषय आहे. एकूण ७१८.२३ चौ. मी. क्षेत्रफळापैकी १३५ चौ. मी. क्षेत्राचा वापर वाणिज्यिक स्वरूपात होत असल्याने ते नूतनीकरणातून वगळण्यात आले आहे.
उर्वरित ५८३.२३ चौ. मी. जागा ही फक्त भाविकांच्या मार्गिकेसाठी वापरली जात असल्याने त्या भागाचा भाडेपट्टा ट्रस्टच्या नावे नूतनीकरण करण्यात आला आहे.

असा झाला निर्णय :

  • मानीव नूतनीकरण : दिनांक ३०.०४.१९९२ पासून मानीव नूतनीकरण ग्राह्य धरण्यात आले आहे.
  • पुढील कालावधी : दिनांक ०१.०१.२०१२ पासून पुढील ३० वर्षांच्या कालावधीसाठी हे नूतनीकरण लागू असेल.
  • दर : यासाठी शासनाने केवळ १ रुपया इतका नाममात्र वार्षिक दर आकारून ‘बाबुलनाथ चॅरिटी ट्रस्ट’च्या नावे भाडेपट्टा करार करण्यास मंजुरी दिली आहे.

विधानसभेत बोलताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, “भाविकांच्या सोयीसाठी आणि ट्रस्टच्या कार्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आदेश तातडीने काढले जातील.” विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्यांनी ट्रस्टला दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button