
मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबईच्या महापौर पदावरून पुन्हा एकदा मोठी घडामोड घडून येणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या एका प्रचलित हॉटेलमध्ये ठेवले आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप केला त्यांनी केला असून, त्यांचे नगरसेवक फुटण्याची भीती त्यांना वाटत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या.
मुंबई: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. शिवसेनेचे नव्याने निवडून आलेले 29 नगरसेवक सध्या मुंबईतील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये थांबले आहेत. सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “एकनाथ शिंदे हे भाजपच्या दबावाखाली आहेत,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. बीएमसीत महायुतीकडून पराभव झाल्यानंतर मौन तोडताना उद्धव यांनी असे संकेत दिले की, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर नियंत्रण मिळवण्याच्या शर्यतीत शिंदे गटात फूट पडू शकते.
उद्धव ठाकरे यांनी 2022 मधील शिवसेनेतील बंडखोरीचा संदर्भ देत म्हटले, “एकनाथ शिंदे भाजपला घाबरलेले आहेत. म्हणूनच त्यांनी आपल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. एकदा जे फुटले आहेत, ते पुन्हा फुटू शकतात, याची त्यांना जाणीव आहे.” त्या बंडखोरीत 40 आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत फूट पडली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद स्वीकारले.
सूत्रांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री किंवा नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न टाळण्यासाठी शिवसेनेच्या सर्व 29 नगरसेवकांना ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापौर पदावरून राजकारण
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून बीएमसीमध्ये अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करण्यात आली आहे. म्हणजेच, भाजप आणि शिवसेना यांच्यात प्रत्येकी अडीच-अडीच वर्षे महापौरपदाची विभागणी व्हावी आणि पहिल्या टप्प्यात शिवसेनेचा महापौर असावा, अशी भूमिका शिवसेनेच्या नगरसेवकांची आहे. कारण शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा महापौर निवडून येऊ शकत नाही, हेही यामागचे महत्त्वाचे कारण आहे.
29 पैकी 25 नगरपालिकांमध्ये महायुतीचा विजय
शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालांनुसार, महाराष्ट्रातील नगरनिगम निवडणुकांमध्ये भाजप–शिवसेना महायुतीने दमदार कामगिरी करत 29 पैकी 25 नगरपालिकांमध्ये विजय मिळवला. बीएमसी निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. मात्र, बहुमताचा आकडा (114) गाठण्यासाठी भाजपला शिंदे गटाच्या शिवसेनेची गरज आहे. या विजयामुळे बीएमसीवरील ठाकरे कुटुंबाचे जवळपास तीन दशकांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.
दरम्यान, सुमारे 20 वर्षांनंतर एकत्र आलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जोडी पूर्णपणे अपयशी ठरली नसल्याचे चित्र आहे. शिवसेना (उबाठा)–मनसे आघाडीने एकूण 71 जागा (65+6) जिंकत मुंबईतील मराठीबहुल भागांतील अनेक प्रभागांवर आपले वर्चस्व कायम राखले आहे.
उद्धव ठाकरे यांनी बहुमत नसतानाही मुंबईत महापौर निवडून आणण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, “मुंबईत आमचाच महापौर निवडून यावा, ही आमची इच्छा आहे. आजही तीच इच्छा आहे, मात्र सध्या आमच्याकडे बहुमत नाही.”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “माझ्या आणि राज यांच्या संयुक्त सभांना प्रचंड गर्दी होती, तर महायुतीच्या सभांमध्ये फक्त रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. मग मला प्रश्न पडतो की, नेमके कुणी त्यांना मतदान केले? कारण त्यांना मते मिळाली, पण आमची गर्दी मतांमध्ये रूपांतरित झाली नाही.”



