खेड नगरपरिषदेत महायुतीची एकहाती सत्ता, 21-0 ने दणदणीत विजय, मविआला एकही जागा नाही

खेड नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, महायुतीने सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवत नगरपरिषदेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निकालात विरोधी महाविकास आघाडीला एकही जागा मिळालेली नाही.
रत्नागिरी : गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषद निवडणुकीत 21-0 असा ऐतिहासिक व एकतर्फी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निकालात महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये कोणाची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निकाल जाहीर होताच महायुतीने 21-0 असा क्लीन स्वीप करत विरोधकांना नामोहरम केले. या निकालात महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही.
या घवघवीत विजयामुळे माधवी भुटाला या नगराध्यक्षा पदावर विराजमान होणार आहेत. या निवडणुकीत गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली होती. निकालानंतर शहरातील राजकीय परिस्थितीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे.
खेड नगरपरिषद निवडणुकीतील हा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.



