RBI चा नामांकित खासगी बँकेला दणका, ग्राहकांना धसका!

आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर नियमभंग केल्याप्रकरणी 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, ग्राहकांच्या ठेवी, पैसे आणि व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असून या कारवाईचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
देशातील बँक ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या काही महिन्यांपासून नियमभंग करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई तर काही बँकांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता आरबीआयने देशातील एका आघाडीच्या खासगी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. मध्यवर्ती बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर तब्बल 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या तपासात बँकेकडून बँकिंग नियमांचे पालन करण्यात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळेच ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
बीएसबीडी (Basic Savings Bank Deposit Account) खात्यांचे नियम न पाळणे, एका ग्राहकाच्या नावावर एकापेक्षा जास्त खाती उघडणे, बिझनेस कॉरस्पॉन्डेंट्सना अधिकृत क्षेत्राबाहेर काम करण्याची परवानगी देणे आणि काही कर्जदारांची चुकीची माहिती क्रेडिट कंपन्यांना पाठवणे, हे दोष आढळले आहेत.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
या कारवाईचा बँक ग्राहकांवर कोणताही थेट नकारात्मक परिणाम होणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. ग्राहकांचे पैसे, ठेवी, एफडी, कर्ज व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू राहतील, असेही केंद्रीय बँकेने सांगितले आहे. (Kotak Mahindra Bank Fine)
एकूणच, बँकिंग क्षेत्रातील शिस्त, पारदर्शकता आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आरबीआय कोणतीही तडजोड करणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. नियमभंग करणारी बँक कितीही मोठी असली तरी कडक कारवाई अटळच, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


