
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आक्रमक रणनीती राबवण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटानंतर आता मनसेलाही मोठा धक्का बसला असून मनसेचे 3 मोठे शिलेदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपकडून होत असलेली सलग पक्षप्रवेशांची मालिका जोरदार सुरू असून, उद्धव ठाकरे गटानंतर मनसेसाठी देखील हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण मनसेचे प्रदेश नेते व माजी नगरसेवक दिनकर पाटील, माजी नगरसेविका लता पाटील आणि माजी नगरसेवक रवींद्र देवरे हे तिघेही आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दिनकर पाटील हे नाशिकमधील प्रभावी नेतृत्व मानले जातात. मनसेकडून विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मते मिळवणारे उमेदवार म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली होती. लता पाटील यांनी सातपूर परिसरातून नगरसेवकपद भूषवले असून रवींद्र देवरे हेही पाटील गटातील विश्वासू सहकारी मानले जातात.
दरम्यान, याच दिवशी ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, अॅड. यतीन वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचाही भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने नाशिकच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.



