Devrai Fire: अभिनेता सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; हजारो झाडे जळून खाक

बीडजवळील अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सह्याद्री देवराई’ला बुधवारी रात्री भीषण आग लागली; ज्यात हजारो झाडे जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांतून ओसाड आणि रखरखीत डोंगर हिरवागार करण्यात आला होता, मात्र डोळ्यादेखत झालेल्या निसर्गहानीमुळे सयाजी शिंदे भावुक झाले.
बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पाला बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत डोंगरावरील हजारो छोटी-मोठी झाडे, रोपे आणि नैसर्गिक वनस्पती जळून खाक झाल्या असून, निसर्गप्रेमींमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आगीने वेगाने रौद्र रूप धारण केले होते. कोरडे गवत आणि वाऱ्यामुळे आग पसरत गेली आणि मोठ्या परिसराला तिने विळखा घातला. या आगीत पक्षी, सरपटणारे प्राणी, त्यांची पिल्ले तसेच नव्याने वाढलेली झाडे आणि रोपे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आग लागल्यानंतर स्थानिक नागरिक, वनविभाग आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे यांनी गवत जाळल्यास ते अधिक चांगले उगवते, हा गैरसमज असल्याचे सांगितले. निसर्गाचे प्रचंड नुकसान होत असल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, घरावर बॉम्ब पडल्यावर जशी अवस्था होते, तशीच अवस्था प्राण्यांच्या घरांची आगीत होते. बीडमधील ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, २०१७ साली जिथे गवतही उगवत नव्हते, अशा ओसाड जागेवर झाडे उगवली, रान हिरवेगार झाले होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘सयाजी शिंदे हे फक्त निमित्त आहे, मात्र हे रान उभे राहण्यामागे अनेक निसर्गप्रेमींचे योगदान आहे,’ असेही ते म्हणाले.
या घटनेनंतर त्यांनी थेट प्रशासनालाही सवाल केला आहे. मे-जून महिन्यात बीड जिल्ह्यात पंधरा लाख झाडे लावल्याचा दावा करण्यात आला होता आणि त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याचे सांगण्यात आले होते. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला होता. मात्र आता या झाडांचा हिशोब कुठे आहे, असा थेट प्रश्न उपस्थित करत ‘पंधरा लाख झाडांचे नेमके काय झाले, हे प्रशासनाने स्पष्ट करावे,’ अशी मागणी सयाजी शिंदे यांनी केली आहे. साताऱ्याहून बीडकडे जाताना प्रत्येक झाडाची काळजी घेतल्याचे सांगत, केवळ कौतुकासाठी अशा घोषणा केल्या जातात का, असा सवालही त्यांनी केला.
झाडांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज- सयाजी शिंदे
तपोवन आणि देवराईंच्या संवर्धनाबाबत बोलताना सयाजी शिंदे यांनी झाडांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. झाडांची कत्तल केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी प्रत्यक्षात वृक्षारोपण होते का, हे तपासणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तपोवन वाचले पाहिजे आणि तपोवनमधील झाडांची कत्तल करणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. आतापर्यंत वीस ते तीस देवराया तयार झाल्या असून, हा आकडा चाळीसच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत शंभर देवराया उभ्या करण्याचे स्वप्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्याच्या माहितीनुसार आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. वनविभागाकडून नेमके किती क्षेत्र बाधित झाले आणि किती झाडांचे नुकसान झाले, याचा अधिकृत अहवाल लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. बीडमधील ही घटना केवळ एका देवराईची हानी नसून, पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला बसलेला मोठा धक्का असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.



