महाराष्ट्र

नांदेडमध्ये सामूहिक आत्महत्या!, मृत्यूचे गूढ कायम… पोलिसांकडून सखोल तपास

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, जवळा मुरार येथील एकाच कुटुंबातील चार जणांचे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, नेमके काय घडले याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला आहे.

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन मुलांचे रेल्वेखाली तर आई वडिलांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हत्या की आत्महत्या याबाबत विविध चर्चांना उधाण आले असून आता पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळा मुरार येथील रहिवासी रमेश सोनाजी लखे आणि त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे हे दोघे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले. त्याच दरम्यान, त्यांच्या दोन तरुण मुलांचे मृतदेह मुदखेडजवळील मुगट परिसरात आढळून आले. या घटनेची माहिती समजताच गावकरी आणि पोलीस प्रशासन हादरून गेले.

घटनेची सूचना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण काय, तसेच या घटनेमागे कोणती पार्श्वभूमी आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये रमेश सोनाजी लखे (वय ५१ वर्षे), राधाबाई रमेश लखे (वय ४५ वर्षे), उमेश रमेश लखे (वय २५ वर्षे) आणि बजरंग रमेश लखे (वय २२ वर्षे) यांचा समावेश आहे. कुटुंबातील चारही सदस्यांच्या अचानक मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गावातील काही नागरिकांकडून या घटनेमागे आर्थिक अडचणींचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. सर्व बाबींची शहानिशा केल्यानंतरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे जवळा मुरार गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून, अनेक नागरिकांनी लखे कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्दैवी घटनेचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button