महाराष्ट्र
Trending

‘आपापसात भांडत राहिलो तर भाजपला वॉकओव्हर मिळेल…’ उद्धव ठाकरे यांचा इशारा; शिवसैनिकांना एकजुटीचे आवाहन

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. रविवारी मुंबईतील शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीत त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुंबई, मराठी अस्मिता आणि पक्षातील ऐक्य यांवर भर दिला.

मुंबई: राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहे. दरम्यान पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असताना, दुसरीकडे शिवसेना (UBT) आणि मनसेने एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे ठरवले आहे. ज्याच्या तयारीसाठी आणि कार्यकर्त्यांचे तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दादर येथील शिवसेना भवनात बैठक पार पडली. यादरम्यान पक्ष प्रमुखांनी कार्यकर्त्यांसोबत अनेक विषयावर चर्चा केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेशी युती होण्यापूर्वी महाराष्ट्रात भाजपची ओळख नव्हती. शिवसेनेने भाजपला बळ दिले; मात्र आज त्याच शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “ज्यांना शिवसेनेने घडवले, तेच आज आमच्यावर हल्ला करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

मुंबईबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, काही शक्ती मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. “शिवसेनेने मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी ही लढाई अनेक वर्षे लढली आहे. कोणालाही मुंबई शिवसेनेकडून हिरावून घेता येणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पक्षातील अंतर्गत मतभेदांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण आपसातच लढत राहिलो, तर त्याचा थेट फायदा भाजपला होईल आणि त्यांना वॉकओव्हर मिळेल.” त्यामुळे फुटीचे राजकारण टाळून एकजूट राखण्याचे त्यांनी आवाहन केले.

तिकीट वाटपावर उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहन

नगरपालिका निवडणुकांतील तिकीट वाटपाबाबत उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केले. “एखाद्याला तिकीट मिळाले नाही, तरीही पक्ष सोडू नका. माझ्या जागी बसून निर्णय घेणे किती कठीण आहे, हे लक्षात येईल,” असे ते म्हणाले. तिकीट वाटपाची संपूर्ण जबाबदारी आपण स्वतः स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या हितासाठी मला दोष दिला गेला, तरी चालेल; मात्र कोणाच्याही निष्ठेला तडा जाऊ देता कामा नये.”

मनसेसोबत युतीवर भाष्य

भाजपवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने केवळ युती तोडली नाही, तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्नही केला. मराठी माणसाच्या हितासाठी अनेक वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केल्याचे त्यांनी नमूद केले. युती किंवा आघाडीत सर्व काही मनासारखे होत नाही, काही जागांवर तडजोड करावी लागते, हेही त्यांनी मान्य केले.

राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होतील. या निवडणुकांत शिवसेना (उद्धव गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना संयुक्तपणे लढणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राज्यभर संयुक्त प्रचार करणार असून, मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच असेल आणि तो शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)–मनसे युतीतूनच असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button