लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका; ई-केवायसी बंधनकारक, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. या योजनेसाठी सरकारने मुदतवाढ देत ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. अजूनही अनेक पात्र महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही, तर संबंधित महिलांना मिळणारा सन्मान निधी थांबवला जाऊ शकतो.
मुंबई: राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेत आली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जातात. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा थेट फायदा होत असून महिला वर्गात ही योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली आहे.
मात्र, पात्र नसतानाही काही महिलांकडून योजनेचा लाभ घेतला जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. अशा अपात्र लाभार्थींना आळा घालण्यासाठी आणि योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया बंधनकारक केली आहे. यापुढे या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.
या योजनेसाठी सुरुवातीला ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर होती. मात्र अनेक महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने सरकारने मुदतवाढ देत ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित केली. आता ई-केवायसीसाठी केवळ काहीच दिवस शिल्लक असून, मिळालेल्या माहितीनुसार यावेळी सरकारकडून पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
दरम्यान, अजूनही अनेक पात्र महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही, तर संबंधित महिलांना मिळणारा सन्मान निधी थांबवला जाऊ शकतो. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून महिलांना आवाहन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,
“लाडक्या बहिणींनो… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता शेवटचे काहीच दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी.”
सरकारच्या या स्पष्ट इशाऱ्यानंतर, ई-केवायसी न करणाऱ्या महिलांचा लाभ थांबण्याची शक्यता असून, त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन आणखी वाढलं आहे.



