
भाजपच्या पुणे उमेदवार पूजा मोरेवर सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग झाले. पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस संबंध, काश्मीर वाद आणि मराठा आंदोलनातील जुने आरोप चर्चेत आले. अखेर भावनिक होत पूजा मोरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला. जाणून घ्या सविस्तर
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, पक्षाच्या उमेदवार पूजा मोरे यांनी तीव्र विरोध, ट्रोलिंग आणि वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच निर्माण झालेल्या वादळामुळे पूजा मोरे भावुक झाल्या असून, त्यांनी रडत आपली बाजू मांडली.
भाजपने पूजा मोरे (धनंजय जाधव यांच्या पत्नी) यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेसशी (शरद पवार गट) संबंध, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील सहभाग, तसेच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यानचे कथित जुने वक्तव्य यामुळे सोशल मीडियावर भाजप नेतृत्वावर टीकेची झोड उठली. पूजा मोरे यांचे जुने फोटो, पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल करत त्यांना जोरदार ट्रोल करण्यात आले.
याशिवाय, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पूजा मोरे आणि त्यांचे पती जम्मू-काश्मीरमध्ये उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या “हा हल्ला हिंदू-मुस्लिम दृष्टीकोनातून पाहू नये” या विधानामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी विचारसरणीशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. काहींनी तर त्यांना देशविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली.
भावनिक स्पष्टीकरण, पण दबाव कायम
या सर्व आरोपांवर पूजा मोरे यांनी भावनिक होत स्पष्टीकरण दिले. काश्मीरमध्ये हल्ल्यानंतर आपण स्वतः बाहेर पडून पीडितांना मदत केली, जखमींना धीर दिला आणि महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात आपल्या नावाने व्हायरल झालेले वादग्रस्त भाषण आपले नसून चुकीच्या पद्धतीने जोडले गेले, असा दावा त्यांनी केला.
राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप
पूजा मोरे यांचे पती धनंजय जाधव यांनी हा संपूर्ण प्रकार राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप केला. वार्ड क्रमांक २ मध्ये बनावट मीडिया एजन्सी सक्रिय असून, ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून चालवली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, चिकन वितरण आणि श्रावण महिन्यातील उपक्रमांवरूनही वाद निर्माण झाला होता. मात्र वाढता विरोध, ट्रोलिंग आणि राजकीय दबाव लक्षात घेता, अखेर पूजा मोरे यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.



