महाराष्ट्र

“आम्ही सगळ्या मुस्लिमांच्या विरोधात नाही, पण जो…”

“देशविरोधी जिहाद करणाऱ्यांना ठोकणारच”; रोहिंग्या-बांगलादेशींवर कारवाईची उघड धमकी, नितेश राणेंचं भडक वक्तव्य

मुंबई: “आम्ही सगळ्या मुस्लिमांच्या विरोधात नाही. जो मुसलमान राष्ट्रभक्त आहे, तो आमचाच आहे. पण जो देशाविरोधात, हिंदू धर्माविरोधात जिहाद करतो, त्याला ठोकल्याशिवाय आम्ही बसणार नाही,” अशी उघड धमकीच राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी दिली. कांदिवली येथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना नितेश राणेंनी अत्यंत आक्रमक आणि भडक भाषेत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, “आमच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आमच्यापेक्षा चांगलं मराठी बोलणारे मुसलमान आहेत. आमच्या सणाला खांद्याला खांदा लावून बसतात. हे राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि याचा आम्हाला अभिमान आहे. पण जे जिहादी मानसिकतेचे आहेत, जे देशाच्या विरोधात काम करतात, त्यांना संपवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”

रोहिंग्या आणि बांगलादेशींवर थेट निशाणा

“१५ तारखेपर्यंत जे कुणी बांगलादेशी, रोहिंग्या इथं असतील त्यांनी बॅगा भरून ठेवा. १६ तारखेनंतर मुंबईत एकही बांगलादेशी, एकही रोहिंग्या ठेवणार नाही. ही धमकी देऊन जातोय. मुंबईत ही घाण नको. सगळं साफ करणार,” असं खळबळजनक वक्तव्य नितेश राणेंनी केलं. “जे काही आहे ते मुंबईकरांचं आहे, हिंदूंचं आहे आणि राष्ट्रभक्तांचं आहे,” असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

सभेत पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, “आज मी मंत्री आहे, त्यामुळे कुणी दमदाटी करत असेल, गुंडगिरी करत असेल, महायुतीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर मस्ती करत असेल तर त्याची जबाबदारी माझ्यावर सोडा. १६ तारीख आमची आहे हे लक्षात ठेवा.” त्यांच्या या वक्तव्याला सभास्थळी उपस्थितांकडून जोरदार टाळ्या आणि घोषणा मिळाल्या.

हिंदू मतांमध्ये फूट पाडणाऱ्यांवर टीका

“काही लोक नेहमी हिंदू मतांमध्ये फूट पाडतात. त्याचा फटका हिंदू समाजालाच बसतो. आज महापालिकेत तुमचे घराचे, वार्डाचे प्रश्न सोडवायचे असतील तर अंतिम सही कोण करू शकतो, तुमच्या पाठीशी कोण उभा राहील याचा विचार करा,” असा थेट राजकीय संदेश त्यांनी मतदारांना दिला.

उत्तर भारतीयांना साद

मराठी-उत्तर भारतीय वादावर बोलताना नितेश राणे यांनी आणखी भडक विधान केलं. “काही लोकांना अचानक मराठी माणसांचा पुळका येतो. आम्ही मूळ शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, चायनिज नाही. उत्तर भारतीय इथे मोठ्या संख्येने आहेत. मराठी यायलाच हवी म्हणून ओरडणाऱ्यांना सांगा, आधी बेहरामपाड्यात जाऊन मराठी शिकवा, मग मला शिकवा. त्यानंतर काय होतं ते बघू,” असा थेट टोला त्यांनी मारला.

“तुम्ही चिंता करू नका. मुंबईत तुम्ही सुरक्षित आहात. ही गॅरंटी घेऊन मी इथं आलोय,” असं सांगत नितेश राणेंनी उत्तर भारतीय मतदारांनाही साद घातली. नितेश राणेंच्या या आक्रमक, भडक आणि थेट धमकीवजा वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता असून, विरोधकांकडून यावर जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हं दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button