आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिंदेंचा राज्यभर जोरदार प्रचार

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रचारावर भर देण्यात आल्याचे या दौर्यातून दिसून येते.
मुंबई: मुंबईसह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर प्रचार दौरे केले. गेल्या ३ ते १३ जानेवारी या कालावधीत त्यांनी विविध शहरांमध्ये जाहीर सभा, रोड शो तसेच पक्षाच्या शाखांना भेटी दिल्या.
प्रचाराच्या या ११ दिवसांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील ५१ ठिकाणी प्रचार केला. यात २९ जाहीर सभा, २५ रोड शो आणि शिवसेनेच्या १४ शाखांना दिलेल्या भेटींचा समावेश आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे झालेल्या रोड शोना नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
राज्यात काही महानगरपालिकांच्या निवडणुका शिवसेना भाजपसोबत महायुतीअंतर्गत, तर काही ठिकाणी स्वबळावर लढवत आहे. अमरावती आणि अकोला येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सभा घेतल्या. तसेच छत्रपती संभाजीनगर, मीरा-भाईंदर, नाशिक, कोल्हापूर, उल्हासनगर आणि कल्याण येथेही त्यांनी प्रचार सभांना उपस्थिती लावली. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी रोड शो आणि प्रचार रॅलींमध्ये सहभाग घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत असून, ऐरोली, घणसोली आणि कोपरखैरणे या भागांमध्ये रोड शो आयोजित करण्यात आले होते. याशिवाय, वरळी डोम येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि शिवाजी पार्क येथे मुंबईतील महायुतीची जाहीर सभा यांनाही उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते.



