महाराष्ट्र

मतदानाआधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर प्राणघातक हल्ला, शहरात खळबळ

नांदेड: राज्यभरातील महापालिका निवडणूका उद्या १५ जानेवारी रोजी होणार आहेत, मात्र त्यापूर्वी नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक एकचे काँग्रेसच्या उमेदवार सरिता भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर मोटारसायकल वरून आलेल्या सहा शस्त्रधारी गुंडांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र भालेराव यांनी खुर्चीचा आधार घेत स्वतःचा बचाव केल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच यादरम्यान परिसरातील स्थानिकांनी देखील तेथे धाव घेतल्यामुळे शिवाजी भालेराव यांचा जीव वाचला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांचा माहितीनुसार चोरीच्या दृष्टीने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नांदेड पोलीस करत आहेत. तर हल्लेखोरांनी ‘तू प्रचार कसा करतोस, खूप भाषणं ठोकतोय. तुझी बिर्याणी करून टाकू’ अशी धमकी देत हल्ला केल्याचे शिवाजी भालेराव म्हणाले.

दिवसाढवळ्या, वस्तीच्या भागात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. मतदानाच्या अगदी तोंडावर उमेदवारावर हल्ला होणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्यासारखेच असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. विरोधकांकडून या घटनेचा निषेध होत असून दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button