
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या मतमोजणीदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यासच ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करण्यात येईल, अशी स्पष्ट माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. सरसकट किंवा नियमितपणे पाडूचा वापर केला जाणार नसून, केवळ अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच त्याचा आधार घेतला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
मुंबई: या निवडणुकीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) निर्मित मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला असून ही यंत्रे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच वापरली जात आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील ही ‘एम3ए’ प्रकारातील मतदान यंत्रे असून, त्यामधील मतमोजणी कंट्रोल युनिट (CU) आणि बॅलेट युनिट (BU) एकमेकांना जोडूनच करणे आवश्यक आहे. मतमोजणीदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यासच पर्यायी व्यवस्था म्हणून पाडूचा वापर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी एकूण 140 पाडू यंत्रांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. मात्र, या यंत्रांचा वापर करताना भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत तंत्रज्ञांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे. मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कोणत्याही गैरसमजाला वाव राहू नये, यासाठी हे नियम काटेकोरपणे पाळले जाणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
पाडू कसे काम करते?
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसारख्या निवडणूक प्रक्रियेत हे उपकरण मतमोजणीदरम्यान केवळ अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत वापरण्यात येते. मुख्य उद्देश हा असा आहे की, जर मतदान यंत्राच्या कंट्रोल युनिटमधून (CU) किंवा बॅलेट युनिटमधून (BU) मतदानाचे निकाल वाचण्यात किंवा प्रक्रियेत काही तांत्रिक अडचण आली, तर पाडूच्या सहाय्याने ती माहिती डिस्प्लेवर पाहता येईल तसेच प्रिंट स्वरूपात मिळवता येईल.
दरम्यान, पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पाडू यंत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे मतमोजणी प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या शंकांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून, निवडणूक निकाल प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वासार्ह राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



