भंडारा नगरपालिकेत ईव्हीएम गैरप्रकार; 7 कर्मचारी निलंबित

भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवाराचं नावं नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव झाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मतदान केंद्र प्रमुखासह एकूण 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये 5 उमेदवार आणि नोटा असे 6 पर्याय असणे आवश्यक होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नाव आणि नोटा हा पर्याय झाकला गेल्यामुळे मशीनवर फक्त 4 उमेदवारांची नावे दिसत होती. त्यामुळे करुणा राऊत यांना मत मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी तात्काळ कारवाई करत कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या प्रांताधिकारी माधुरी तिखे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.



