
एरव्ही शेअर बाजार रविवारी नेहमी बंद असतो, पण आगामी वर्षात एका महत्वपूर्ण कारणामुळे सरकारने रविवारी शेअर बाजार खुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या यामागचे उद्देश काय आहे.
मुंबई: देशाचा अर्थसंकल्प नेहमीच १ फेब्रुवारीला सादर केला जातो, परंतु यावेळी १ फेब्रुवारी रविवारी येत आहे. त्यामुळे, पहिल्यांदाच रविवारी संसद आणि शेअर बाजार खुले राहणार आहेत.
रविवार नेहमीच सुट्टीचा असतो. परंतु २०२६ ला १ फेब्रुवारी रोजी रविवारी येत आहे. परिणामी, अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजीच सादर केला जाणार असल्यामुळे त्या दिवशी संसद खुली असेल आणि शेअर बाजारही खुले असतील. नियमानुसार, दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यामुळे, बजेटच्या दिवशी सकाळपासून दलाल स्ट्रीटवर गर्दी असते.
रविवारी शेअर बाजार व्यवहार करता येणार?
मुळात, बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) दोन्ही एक्सचेंज सहसा आठवड्याच्या शेवटी, म्हणजे शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद असतात. असे असले तरी बजेटसारख्या महत्त्वाच्या दिवशी शेअर बाजार नेहमीच खुले असतात. कारण, बजेटचा दिवस हा गुंतवणूकदारांसाठी एक रोमांचक काळ असतो. त्यामुळे, आगामी वर्षात १ फेब्रुवारी (रविवार) रोजी बजेट सादर केला जात असल्याने, आर्थिक सर्वेक्षण ३१ जानेवारी (शनिवार) किंवा त्यापूर्वीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, म्हणजे ३० जानेवारी (शुक्रवार) रोजी सादर केले जाऊ शकते.
हा निर्णय का घेण्यात आला?
बजेटच्या दिवशी बाजार खुले ठेवण्याचा निर्णय घेण्याचे करण, की प्रमुख आर्थिक पावलांचा थेट परिणाम बाजारात त्वरित दिसून येईल. अनेक वर्षांपासून, गुंतवणूकदार दुसऱ्या दिवशी अचानक होणारे चढउतार टाळण्यासाठी बजेटच्या दिवशी बाजार चालू राहावेत अशी मागणी करत होते.
यावर्षी, १ फेब्रुवारी २०२५ रोजी शनिवार होता, त्यामुळे शनिवारी बजेट सादर करण्यात आला होता, परिणामी बजेटचा दिवस असल्याने शनिवार बाजार खुले ठेवण्यात आले होते. यापूर्वीही, २८ फेब्रुवारी १९९९ रोजी रविवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. पूर्वी, अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी रोजी सादर केला जात असे.


