BMC Election 2026: संजय राऊत यांनी दिले राज–उद्धव ठाकरे यांच्या युतीचे संकेत, उद्या अधिकृत घोषणा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबातील राजकीय समीकरण पुन्हा एकत्र येण्याच्या मार्गावर असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट–मनसे युतीची अधिकृत घोषणा 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून राज-उद्धव यांच्या युतीचे संकेत दिले असून, त्यामुळे मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महानगरपालिक निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत गरजेची असून त्यासाठी राज उद्धव यांची युती खूप महत्वाची ठरणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील 227 प्रभागांपैकी ठाकरे गट 145 ते 150 जागांवर, तर मनसे 65 ते 70 जागांवर निवडणूक लढवेल. युतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी 10 ते 12 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, 2017 च्या निवडणुकीत ठाकरे गटाने जिंकलेल्या 12 ते 15 जागा मनसेसाठी सोडण्यात आल्या असून, या प्रभागांमध्ये मनसेकडे तुलनेने ताकदवान उमेदवार उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, भांडूप, विक्रोळी, मुलुंड तसेच पश्चिम उपनगरातील काही वॉर्डांवरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये मतभेद होते. जोपर्यंत संपूर्ण जागावाटप अंतिम होत नाही, तोपर्यंत युतीची घोषणा न करण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. काल मातोश्रीवर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शिवडी आणि दादरमधील तिढा सुटला, तर उर्वरित वादग्रस्त जागांवरही तोडगा निघाल्याची माहिती आहे. त्यामुळेच आता उद्या युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेतील इच्छुक उमेदवार एबी फॉर्म मिळण्याकडे लक्ष ठेवून आहेत. युतीची घोषणा होताच उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता असून, प्रचारालाही औपचारिक सुरुवात होईल. राज–उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबईच्या राजकारणात मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.



