खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय; SIT स्थापन करावी – सुनिल तटकरे

खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी ( SIT) स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना केली.
मुंबई : रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात घडलेली घटना राज्यात खळबळ उडवणारी ठरली असून या घटनेत मंगेश सदाशिव काळोखे यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. मंगेश काळोखे हे खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. दिनदिवशी सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या हत्येने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून राजकीय वातावरणही तापले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष या नात्याने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली. सध्या सुरू असलेल्या तपासात व्यापकता आणण्याची गरज असून, निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी एसआयटी आवश्यक असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
खोपोलीत घडलेली हत्या ही पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अद्याप संपूर्ण सत्य समोर आलेले नाही. या प्रकरणावर विविध स्तरांतून आरोप-प्रत्यारोप सुरू असून त्यावर भाष्य करताना सुनिल तटकरे म्हणाले की, तपास सुरू असताना बिनबुडाचे वक्तव्य करणे उचित नाही. जी घटना घडली, त्यामागील वादविवाद किंवा कारणे याची संपूर्ण माहिती पोलीस तपासातूनच समोर येईल.
या प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा दुरान्वयेही संबंध नसावा, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. मात्र तपास सुरू असल्याने तपासात बाधा येईल असे कोणतेही विधान आपण करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. काही नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांवर टोला लगावत, संबंधित व्यक्तींचा पूर्व इतिहास त्यांच्या निवडणूक अर्जांमधून पाहता येईल, असे सूचक विधानही त्यांनी केले.
दरम्यान, मंगेश काळोखे यांच्या हत्येमुळे खोपोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. प्रशासनाने बंदोबस्त वाढवला असून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. आता या प्रकरणात एसआयटी स्थापन होते का, तपास कोणत्या दिशेने जातो आणि या हत्येमागील नेमका कट काय होता, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



