महाराष्ट्र
Trending

मुख्यमंत्र्यांनी केली आठवलेंची नाराजी दूर, बैठकीत अखेर काय ठरले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रिपब्लिकन पक्षाचे समाधान झाले असून, मुंबई महापालिकेतील जागावाटपावरून निर्माण झालेली नाराजी आता पूर्णतः दूर झाली आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून नाराज असलेल्या रिपब्लिकन पक्षाची नाराजी अखेर दूर झाली आहे.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यानंतर महत्त्वपूर्ण तोडगा निघाला आहे. या भेटीत मुंबई महापालिकेतील जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली असून, भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातील काही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यावर सहमती झाली आहे.

महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाला सुरुवातीला एकही जागा न मिळाल्याने पक्षात तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या नाराजीतून रिपब्लिकन पक्षाच्या तब्बल 30 उमेदवारांनी मुंबई महानगरपालिकेसाठी स्वबळावर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करत रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या कोट्यातील 6 ते 7 जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यास संमती दर्शवली असून, तसे निर्देश भाजपचे मुंबई अध्यक्ष आमित साटम आणि आमदार प्रविण दरेकर यांना दिले आहेत.

याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कोट्यातीलही 6 ते 7 जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात येणार आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली जाणार असून, शिवसेनेच्या कोट्यातून रिपब्लिकन पक्षाला हव्या असलेल्या जागा सोडण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे एकूण भाजप आणि शिवसेना कोट्यातील मिळून किमान 12 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील.

17 जागांची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

या बैठकीदरम्यान रिपब्लिकन पक्षाने मुंबई महापालिकेसाठी 17 जागांची अंतिम यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली. या यादीतील किमान 12 जागांवर भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार माघार घेणार असून, त्या जागांवर रिपब्लिकन पक्षाला महायुतीचा अधिकृत पाठिंबा राहील. उर्वरित 18 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्वबळावर निवडणूक लढवतील. मात्र, या 30 जागांव्यतिरिक्त मुंबईतील उर्वरित 197 जागांवर रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

मुख्यमंत्री भेटीत शिष्टमंडळ उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या या बैठकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या शिष्टमंडळात रामदास आठवले यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे, तसेच एम. एस. नंदा, हेमंत रणपिसे, सचिनभाई मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.

या चर्चेदरम्यान रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विविध मागण्यांचे निवेदनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला दोन विधानपरिषद सदस्य, 60 महामंडळांवरील सदस्यपदे तसेच मुंबई महानगरपालिकेत दोन स्वीकृत सदस्य देण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता. या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रिपब्लिकन पक्षाचे समाधान झाले असून, मुंबई महापालिकेतील जागावाटपावरून निर्माण झालेली नाराजी आता पूर्णतः दूर झाली आहे. आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजप आणि शिवसेनेसोबत एकजुटीने प्रचार करेल आणि महायुतीच्या विजयासाठी सक्रिय भूमिका बजावेल, असे स्पष्ट संकेत या भेटीनंतर देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button