
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासांपासून या दोन्ही उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नसून, त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अहिल्यानगर: राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं असून येत्या १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता अहिल्यानगरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या २४ तासांपासून या दोन्ही उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नसून, त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली.
केडगाव परिसर संवेदनशील भाग मानला जातो. निवडणूक बिनविरोध होण्यासाठीच मनसेच्या उमेदवारांचे अपहरण करण्यात आल्याचा संशय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक १७ मधून निवडणूक लढवत असलेले राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, या दोन्ही उमेदवारांपैकी एक उमेदवार भाजपाच्या तर दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत होता. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या घटनेनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, गायब झालेल्या उमेदवारांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा म्हणाले, “मनसेचे दोन्ही उमेदवार गेल्या २४ तासांपासून बेपत्ता आहेत. पक्ष कार्यालयात चौकशी केली असता ते प्रचारासाठी साहित्य घेऊन बाहेर पडले होते. मात्र ते प्रचारालाही गेले नाहीत आणि घरीही पोहोचले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांचे फोन सतत येत आहेत. त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीय चिंतेत असून, काही अनुचित घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल ते करत आहेत.”
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



