अकोल्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा गावात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अकोला: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर काल ६ जानेवारी रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा गावात अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने धारदार शस्त्राने पटेल यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून हल्ल्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून किंवा वैयक्तिक शत्रुत्वातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिदायत पटेल यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आरोपींमध्ये मोठी नावं समोर आल्याने खळबळ
पटेल यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत मोठी नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याला कारणीभूत असल्याचा आरोप केलेल्या नावांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते संजय बोडखे, काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांची आरोपींमध्ये नावे आहेत.
याशिवाय हल्लेखोर आरोपी उबेद पटेल आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यात मोठ्या राजकीय नेत्यांची नावे असल्याने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ला आणि कट रचल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता खुनाचा गुन्हा किती लोकांवर दाखल होतो? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
जुन्या वादाची पार्श्वभूमी
दरम्यान, २४ मे २०१९ रोजी भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे कार्यकर्ते मतीन पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल आहे. आजचा हल्लेखोर उबेद पटेल हा मृतक मतीन पटेल यांचा पुतण्या असून, काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला केल्याची चर्चा आहे. सहा महिन्यांपूर्वी उबेद पटेल याने आत्महत्येचाही प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे.



