
उल्हासनगर शहरातील महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक कार्यकर्त्यामध्ये अंतर्गत मतभेद असल्याकारणामुळे एबी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत काही गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे, भाजपकडे नाराजी व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता संपूर्ण ७८ जागांवर स्वतःच्या उमेदवारांना अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये महायुती तुटली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही बाजूकडून महायुतीला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी सांगितले की, त्यांनी दोन वेळा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना महायुतीसाठी बोलणी करण्यासाठी आमंत्रित केले, पण प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे महायुतीची तयारी अर्धवट राहिली आहे.
दुसरीकडे, शिवसेना, टीम ओमी कलानी आणि साई पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची दोस्ती गटबंधनाची पहिली बैठक रिजेन्सी हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत सर्व ७८ जागांबाबत चर्चा झाली, मात्र भाजपच्या सहभागावर अजून निर्णय झाला नाही. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्तरावर होणार असल्याचे समजते.



