शहर
Trending

भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, नऊ जण जखमी

भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो जवळ बेस्ट बसने 13 प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : मुंबईच्या भांडुप परिसरात सोमवारी रात्री एक भीषण अपघात घडला. भांडुप (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ बीईएसटी बस रिव्हर्स घेत असताना नियंत्रण सुटल्याने पादचाऱ्यांना जोरदार धडक बसली. या दुर्दैवी अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. त्याचवेळी बीईएसटी बस रिव्हर्स घेत असताना अचानक मागील बाजूस उभ्या असलेल्या लोकांना धडकली. काही क्षणातच आरडाओरड सुरू झाली आणि लोक मदतीसाठी धावून आले. काही जण बसखाली अडकल्याचेही सांगण्यात येत आहे.

अपघातानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर चार जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी बीईएसटी बसचालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. बस रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा झाला का, तांत्रिक बिघाड होता का, याचा तपास केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यास सुरुवात केली आहे.

या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

भांडुपसारख्या गजबजलेल्या परिसरात वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button