
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत तब्बल ४८ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात आठ प्रवाशांना अटक करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची माहिती कस्टम्स अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई : कस्टम्स एअरपोर्ट कमिश्नरेटच्या विशेष पथकाने १८ ते २२ डिसेंबर या कालावधीत ही कारवाई केली. प्रोफाइलिंग आणि गोपनीय माहितीच्या (इंटेलिजन्स इनपुट) आधारे बँकॉक (थायलंड) आणि मस्कत (ओमान) येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात आले होते.
शॅम्पूच्या बाटल्या आणि स्नॅक्स बॉक्समध्ये लपवलेला गांजा
कस्टम्स अधिकाऱ्यांनी संशयावरून तपासणी केल्यानंतर प्रवाशांच्या सामानामध्ये शॅम्पूच्या बाटल्या आणि टिन स्नॅक बॉक्समध्ये अत्यंत कौशल्याने लपवलेला हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. वेगवेगळ्या प्रकरणांतून एकूण ४८ किलोहून अधिक हायड्रोपोनिक वीड जप्त करण्यात आला.
बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून सर्वाधिक जप्ती
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून प्रवास करणाऱ्या पाच प्रवाशांकडून ३५.०४५ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारातील अंदाजे किंमत ३५ कोटी रुपये आहे.
याशिवाय, दोन वेगवेगळ्या प्रकरणांत बँकॉकहून परतलेल्या दोन प्रवाशांकडून १३.००३ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे १३ कोटी रुपये आहे.
मस्कतहून आलेल्या प्रवाशाकडून एम्फेटामिन जप्त
१८ डिसेंबर रोजी मस्कत येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाकडून ८१ ग्रॅम एम्फेटामिन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १६.२ लाख रुपये असल्याचे कस्टम्स अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कारवाईदरम्यान कस्टम्स विभागाने अमली पदार्थांव्यतिरिक्त ३५.१८ लाख रुपये किमतीचे २८३ ग्रॅम हिऱ्यांचे दागिने, २४.९१ लाख रुपये किमतीचे ६.६ किलो पॉलिश केलेले सेमी-प्रेशियस स्टोन्स, तसेच २२ डिसेंबर रोजी फुजैराहला जाणाऱ्या प्रवाशांकडून ४५.२६ लाख रुपये किमतीचे विदेशी चलन जप्त केले आहे.
आठही आरोपी अटकेत
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित आठही प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तस्करीमागे कोणते आंतरराष्ट्रीय जाळे कार्यरत आहे, याचा सखोल तपास कस्टम्स विभागाकडून सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



