महाराष्ट्र

१२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान; आजपासून आचारसंहिता लागू

मुंबई: मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना आयुक्त वाघमारे बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या क्षेत्राबाहेरूनही मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या घोषणा किंवा कृती करता येणार नाहीत. मात्र, नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन मदतीसाठी आवश्यक उपाययोजनांना आचारसंहितेची अडचण येणार नाही. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन बंधनकारक असेल.

५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकाच वेळी होत असल्याने प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागतील—एक जिल्हा परिषदेच्या विभागासाठी आणि एक पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी.

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहेत. याआधी नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिका निवडणुकांतही हीच पद्धत वापरण्यात आली होती.

राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास, ते मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाचा पुरावा द्यावा लागेल. निकालानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवाराची निवड रद्द होईल.

या निवडणुकांसाठी सुमारे २५,४८२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ५१,५३७ कंट्रोल युनिट आणि १,१०,३२९ बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

१ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या याद्यांचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करण्यात आला आहे. संभाव्य दुबार मतदार ओळखण्यासाठी (**) असे चिन्ह देण्यात आले आहे. मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती मिळण्यासाठी ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप तसेच mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे.

मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला आणि तान्ह्या बाळांसह येणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाईल. रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, वीज, शौचालय आणि सावलीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. महिला कर्मचाऱ्यांचे ‘पिंक मतदान केंद्र’ही उभारण्यात येणार आहेत.

मतदानाच्या २४ तास आधी म्हणजे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजता जाहीर प्रचाराची समाप्ती होईल. त्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमांवरील प्रचारात्मक जाहिरातींना बंदी राहील. तसेच ३ फेब्रुवारी रोजी रात्री १० नंतर सभा, प्रचारफेऱ्या व ध्वनिक्षेप वापरता येणार नाही.

जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागांच्या संख्येनुसार उमेदवारांसाठी खर्च मर्यादा ६ लाख ते ९ लाख रुपये, तर पंचायत समित्यांसाठी ४.५ लाख ते ६ लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी: १६ जानेवारी २०२६
  • नामनिर्देशनपत्र दाखल: १६ ते २१ जानेवारी २०२६
  • छाननी: २२ जानेवारी २०२६
  • माघार व चिन्ह वाटप: २७ जानेवारी २०२६
  • मतदान: ५ फेब्रुवारी २०२६
  • मतमोजणी: ७ फेब्रुवारी २०२६

या निवडणुकांद्वारे जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी प्रतिनिधी निवडले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button