महाराष्ट्र
Trending

कोकाटे रमी व्हिडिओ प्रकरणात रोहित पवारांना कोर्टाचा झटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात न्यायालयाने रोहित पवार यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई: काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओनंतर कोकाटे यांनी पवारांविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत कोकाटे यांच्या आरोपांना आधार असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

या अहवालाची दखल घेत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने रोहित पवार यांना येत्या ९ तारखेला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, पुढे रोहित पवार कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, याआधीच्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयात दिलेल्या जबाबात सांगितले होते की, त्यांच्या मोबाईलवर ‘जंगली रमी’ ची जाहिरात आली होती. ती बंद करण्यास १५ ते २० मिनिटे लागली आणि याच दरम्यानचा व्हिडिओ काढून रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला.

कोकाटे यांनी असा आरोपही केला होता की, या व्हिडिओमुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला, तसेच कृषी खात्याचे मंत्रिपदही गमवावे लागले. तसेच, “रोहित पवार विधान परिषद सदस्य नसताना त्यांच्याकडे हा व्हिडिओ कसा पोहोचला? कोणी काढला?” याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली होती.

या सर्व घडामोडींनंतर रोहित पवार यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने प्रकरण आता अधिक गांभीर्याने पुढे जाताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button