मराठी बोलत नाही म्हणून आईनेच केली पोटच्या पोरीची हत्या, नवी मुंबईतील घटना

एका आईचे मराठी भाषेवरील प्रेम, आपल्या पोटच्या पोरीचा देखील जीव घेऊ शकतो! यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र ही घटना नवी मुंबईत घडली आहे. लेक मराठी ऐवजी हिंदी बोलते म्हणून आईनेच आपल्या 6 वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. या हत्येचे कारण समजल्यावर पोलिस देखील चक्रावून गेले आहेत.
नवी मुंबई? महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील कळंबोली परिसरात एका आईने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा एकमेव “दोष” म्हणजे ती मराठी नीट बोलू शकत नव्हती.
पोलिसांच्या दीर्घ चौकशीनंतर आरोपी महिलेने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेला मुलगी असून मुलगा नसल्याची खंत होती. तसेच ती काही मानसिक आजारांवर उपचार घेत होती.
३० वर्षीय ही महिला नवी मुंबईतील कळंबोली, सेक्टर १ येथील गुरुसंकल्प हाऊसिंग सोसायटीमध्ये वास्तव्यास होती. सुरुवातीला तिने मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. मंगळवारीच मुलीची हत्या करण्यात आली होती. त्याच दिवशी महिलेची सासू घरी आली होती, मात्र त्यांना काही कारणांमुळे आपल्या नातीला भेटता आले नाही. त्यानंतर जेव्हा संध्याकाळी महिलेचा पती घरी आल्यावर त्याला मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे महिलेने पुन्हा हृदयविकाराचा दावा केला. संशयास्पद मृत्यू असल्याने विशेष शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात श्वासनलिकेत अडथळा आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पालकांची सखोल चौकशी करण्यात आली. सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर महिलेने मुलीची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली आहे.
ही महिला विज्ञान शाखेची पदवीधर असून २०१७ साली तिचे लग्न झाले होते. तिचा पती आयटी अभियंता आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना मुलगी झाली होती.
पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की, मुलीला लहानपणापासूनच बोलण्यात अडचण होती. ती मराठीऐवजी बहुतेक हिंदीत बोलत असे. यामुळे आईला सतत राग येत असे. तिने तिच्या पतीला वारंवार सांगितले होते की, “मला असे मूल नको आहे; ती नीट बोलत नाही.” हा द्वेष हळूहळू भयानक निर्णयात बदलला.



