महाराष्ट्र
Trending

काँग्रेसला निवडणुकीआधीच धक्का; मोठ्या नेत्याने सोडली साथ, तत्काळ भाजपात प्रवेश

सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी अचानक राजीनामा देत काही मिनिटांतच भाजपात प्रवेश केल्याने जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना त्यांचा राजीनामा पक्षला धक्का देणारा आहे.

सोलापूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसची साथ सोडत असल्याने पक्ष अडचणीत सापडला आहे. वाढत्या राजीनाम्यांमुळे निवडणूक रणनीतीवर परिणाम होण्याची भीती काँग्रेसमध्ये व्यक्त होत आहे.

अशातच सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी अचानक राजीनामा देत काही मिनिटांतच भाजपात प्रवेश केल्याने जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट भाजप कार्यालय गाठून पक्षप्रवेश केला. बंदपट्टे हे मागील आठ वर्षांपासून उत्तर सोलापूर मतदारसंघात सक्रिय काँग्रेस कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.

आपल्या पक्षत्यागाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “मागील आठ वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम केले. सुशीलकुमार शिंदे, प्रणिती ताई शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन नरुटे यांच्यासोबत जोमाने काम केले. मात्र शहर उत्तरमध्ये ज्या ताकदीने काम व्हायला हवे होते, ते होत नाही असे जाणवू लागले. मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि जनतेकडून मला भाजपकडून निवडणूक लढवण्याची मागणी होऊ लागली. त्यांच्या इच्छेला मान देत मी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.”

सुशील बंदपट्टे यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक ४ (ब) ओबीसी पुरुष या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

स्थानिक निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या घरातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत असल्याने, सोलापूरसह राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button