वडिलांवरील वक्तव्यावरून रितेश देशमुखचे भाजप नेत्याला चोख प्रत्युत्तर, मागावी लागली माफी

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकण्याबाबत महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाढत्या विरोधानंतर रवींद्र चव्हाण यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली आहे.
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केले. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं ते म्हणाले. रविंद्र चव्हाण यांच्या या विधानाचा जोरदार निषेध केला जात आहे. अशातच विलासराव देशमुख यांचे सुपुत्र, अभिनेता रितेश देशमुख याने रविंद्र चव्हाण यांच्या या विधानाला सडेतोड उत्तर सोशल मिडियाच्या माध्यमांतून दिलं आहे.
काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
सोमवारी लातूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना रवींद्र चव्हाण म्हणाले, “तुमचा उत्साह पाहून मी १०० टक्के म्हणू शकतो की विलासराव देशमुखांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील.” भाजप नेत्याचे हे विधान लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात करण्यात आले होते, जिथे चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा हवाला देत पक्षाच्या विजयाची आशा व्यक्त केली.
रितेश देशमुखचे सडेतोड प्रत्युत्तर
रवींद्र चव्हाण यांच्या विधानाला उत्तर देताना रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “मी दोन्ही हात जोडून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेल्या असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र.” रितेश देशमुखनं हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले
चव्हाण यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपने राज्याच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या नेत्याच्या वारशाची उपेक्षा करत असल्याचा आरोप केला.
मुंबईत जारी केलेल्या निवेदनात काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, लातूरमधील विलासराव देशमुखांच्या आठवणी कोणीही पुसून टाकू शकत नाही. पक्षाने पुढे म्हटले आहे की यापूर्वीही अनेक लोकांनी असे करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जिल्ह्यातील लोकांनी त्यांना आरसा दाखवला आहे.
काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी लातूरला राष्ट्रीय ओळख मिळवून दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्य या प्रदेशाच्या विकासासाठी त्यांनी समर्पित केले. काँग्रेसने भाजप नेत्यांवर लातूरच्या दौऱ्यात सत्तेच्या नशेत बेजबाबदार आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप केला.
रवींद्र चव्हाण यांनी मागीतली माफी
मंगळवारी, या मुद्द्यावरील वाद वाढल्यानंतर, रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आणि त्यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. ते म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरी सुविधा हा मुख्य मुद्दा असावा. हे प्रश्न लवकर कोण सोडवेल हे महत्त्वाचे आहे. मी विलासराव देशमुखांवर टीका केली नाही, परंतु काँग्रेस त्यांच्या नावाने मते मागत आहे.” विलासराव देशमुख हे एक महान नेते आणि मुख्यमंत्री होते. जर यामुळे त्यांच्या मुलाच्या, जो माझा चांगला मित्र आहे, भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. या विधानाकडे राजकीयदृष्ट्या पाहिले जाऊ नये.



