महाराष्ट्र

“जणू काही रशिया युक्रेनच एकत्र आले आहेत, असा हायप केला जातोय” मुख्यमंत्री

‘अस्तित्व शोधणारे दोन पक्ष एकत्र आले असून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडे कोणतीही ठोस विचारधारा उरलेली नाही. त्यांनी विचारांची राजकारण संपवली असून आता संधीसाधू आणि अवसरवादी राजकारण करत आहेत. त्यामुळेच तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे. अशी ठाकरे बंधूंवर भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) युती जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मुंबईत पराभवाच्या भीतीने दोन घराणेशाही पक्ष एकत्र आले आहेत. या एकत्र येण्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की जनता एनडीए आणि महायुतीलाच निवडणार आहे.” त्यांनी या युतीवर उपरोधिक टीका करत, “जणू काही रशिया आणि युक्रेन एकत्र आले आहेत, पुतिन आणि झेलेन्स्की चर्चा करत आहेत, असा हायप तयार केला जात होता,” असेही म्हटले.

फडणवीस पुढे म्हणाले की, “मुंबईतील विकासाच्या लाटेमुळे आणि आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. ही अशी दोन पक्षांची युती आहे, ज्यांनी आपला मतदार गमावला आहे, जनतेचा विश्वास गमावला आहे आणि आता आपले अस्तित्व शोधत आहेत.”

अस्तित्वासाठी युती करून निवडणूक जिंकता येत नाही – फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “फक्त अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र येऊन निवडणूक जिंकता येत नाही. मुंबईकरांनी आमचे विकासकाम पाहिले आहे. बीएमसी निवडणुकीत महायुतीच जिंकणार आणि मुंबई आमच्यासोबत आहे, तसेच आमच्यासोबतच राहील.”

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पक्ष फोडण्याचे आरोप केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे हे अत्यंत निराश आणि हताश झाले आहेत. ते वारंवार तेच आरोप करत आहेत.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण विधान करत म्हटले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडे कोणतीही ठोस विचारधारा उरलेली नाही. त्यांनी विचारांची राजकारण संपवली असून आता संधीसाधू आणि अवसरवादी राजकारण करत आहेत. त्यामुळेच तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे.”

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असली, तरी भाजप आणि महायुतीकडून या युतीचा फारसा परिणाम होणार नाही, असा ठाम दावा सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button