मागाठाणेत पियुष गोयल यांचे थेट आवाहन, विरोधकांवर निशाणा

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदिवलीतील सभेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे मतदारांना थेट आवाहन
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदिवलीतील मागाठाणे परिसरात महायुतीने प्रचाराचा जोर वाढवला आहे. भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या उमेदवार निशा परुळेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी मतदारांना थेट आवाहन केले. “तुमच्या प्रत्येक मताची ताकद सत्ता बदलू शकते” असे सांगत त्यांनी महायुतीचा ऐतिहासिक विजय निश्चित असल्याचा दावा केला.
यावेळी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर, वॉर्ड क्रमांक २५ च्या उमेदवार निशा परुळेकर, वॉर्ड क्रमांक २६ च्या उमेदवार प्रीतम पंडागळे, आप्पा बेलवळकर, वॉर्ड अध्यक्ष पवन तिवारी, महिला वॉर्ड अध्यक्षा सुनयना कदम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, राहुल भंडारी, राकेश सिंग, अविनाश राय यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सभेत विकासकामांवर भर देताना गोयल यांनी ठाकूर व्हिलेज येथे कौशल्य विकास व रोजगार केंद्र, स्थानिकांसाठी छोट्या रुग्णालयाची संकल्पना आणि नॅशनल पार्कमधील वनराणी ट्रेन सुरू करण्याची माहिती दिली. केंद्र, राज्य आणि आगामी महापालिकेतही महायुतीची सत्ता येणार असल्याने विकासकामे वेगाने होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“घाणेरडे राजकारण” संपवण्याची गरज
आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर टीका करत स्थानिक पातळीवरील “घाणेरडे राजकारण” संपवण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच निशा परुळेकर यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा उल्लेख करत त्यांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले.
एकूणच, या सभेतून महायुतीने विकास, सत्ता आणि आत्मविश्वासाचा स्पष्ट संदेश देत निवडणूक रणधुमाळी अधिक तीव्र केली आहे.



