महाराष्ट्र
Trending

मतदानाआधीच भाजपाचा ११ जागांवर बिनविरोध विजय

महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून विविध महापालिकांमध्ये पक्षाने थेट ११ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे.

मुंबई: कल्याण-डोंबिवली, धुळे, पनवेल आणि भिवंडी महापालिकांमध्ये भाजपाच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे.

मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक ठिकाणी काटे की टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वच पक्षांनी ताकदीचे आणि प्रभावी उमेदवार मैदानात उतरवले असतानाही काही महापालिकांमध्ये भाजपाला थेट विरोध करणारा उमेदवारच उरलेला नाही. परिणामी मतदानाआधीच भाजपाने अनेक जागांवर बिनविरोध विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे.

ज्यामध्ये, कल्याण-डोंबिवली, धुळे, पनवेल आणि भिवंडी महापालिकांमध्ये भाजपाचे एकूण ११ उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेणकर या उमेदवार अर्ज छाननीच्या दिवशीच बिनविरोध विजयी ठरल्या. अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया गुरुवार (१ जानेवारी) पासून सुरू झाल्यानंतर भाजपाच्या आणखी दोन उमेदवारांनी विजय मिळवला. यामध्ये मंदा सुभाष पाटील आणि ज्योती पवन पाटील यांचा समावेश आहे.

पनवेल महापालिकेतही भाजपाने अर्ज छाननीच्या दिवशीच खाते उघडले. प्रभाग क्रमांक १८ मधून भाजपाचे नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाला.

धुळे महापालिकेत भाजपाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी सुरेखा उगले यांचा विजय घोषित झाला. तसेच प्रभाग क्रमांक १ मधून उज्ज्वला भोसले बिनविरोध निवडल्या गेल्या असून, ज्योत्सना पाटील यांचाही विजय निश्चित झाला आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही ठिकाणी खाते उघडल्याचे चित्र आहे. मात्र, मतदानाआधीच मिळालेल्या बिनविरोध विजयांमुळे भाजपाचा विजयरथ वेगाने धावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button