सहा महिन्यांत एसटीच्या ‘पॅकेज टूर’ला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद; ४,०३९ टूरमधून १९.२४ कोटींची कमाई

एसटीच्या पॅकेज टूरमुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नवे पंख लाभले असून, महामंडळाच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे.
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘पॅकेज टूर’ उपक्रमाने केवळ सहा महिन्यांत विक्रमी यश मिळवत पर्यटन क्षेत्रात आपली प्रभावी छाप उमटवली आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या काळात राज्यभरात तब्बल ४,०३९ पॅकेज टूर यशस्वीरित्या पार पडल्या. या कालावधीत लालपरीने २६.९७ लाख किलोमीटरचा प्रवास केला आणि ₹१९.२४ कोटींचे उत्पन्न एसटीच्या तिजोरीत जमा झाले.
सांगली अव्वल; कोल्हापूर महसुलात आघाडीवर
पॅकेज टूरच्या संख्येत सांगली विभागाने ५८१ टूरसह सर्वाधिक आघाडी घेतली. त्यापाठोपाठ कोल्हापूर (५६१), सातारा (३९१), अहिल्यानगर (३६२) आणि पुणे (२८८) या विभागांनी चांगली कामगिरी केली. महसूलाच्या बाबतीत मात्र कोल्हापूर विभागाने ₹३.२५ कोटी कमावत पहिला क्रमांक पटकावला. तर अहिल्यानगर (₹२.४५ कोटी), सांगली (₹२.३५ कोटी), सातारा (₹२.११ कोटी) आणि पुणे (₹१.३६ कोटी) यांनीही मोठा महसूल मिळवला.
मराठवाडा आणि विदर्भातही उत्साहपूर्ण प्रतिसाद
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, जालना तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या विभागांमध्येही पॅकेज टूरसेवा प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.
पर्यटनाला नवी दिशा – एसटीच्या उत्पन्नात भरघोस वाढ
एसटीच्या पॅकेज टूरमुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नवे पंख लाभले असून, महामंडळाच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी नाविन्यपूर्ण आणि आकर्षक पॅकेजेस उपलब्ध करून देण्याची तयारी एसटीने दर्शवली आहे. राज्यात एसटीच्या ‘पॅकेज टूर’चा सुवर्णकाळ सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.



