शहर
Trending

प्रभाग २१७: शशिकांत पवारांची उमेदवारी मागे, सेना–मनसे युतीच्या निर्णयावर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

राजकीय जाणकारांच्या मते, शशिकांत पवार उमेदवार राहिले असते, तर भाजपचे अस्थानिक उमेदवार गौरांग झवेरी यांना चुरशीची लढत मिळाली असती.

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक २१७ मधून महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज (एबी फॉर्म) भरलेले शशिकांत पवार यांनी आज आपली उमेदवारी अधिकृतपणे मागे घेतली आहे. मातोश्री येथून आदेश प्राप्त झाल्यानंतर पक्षप्रमुखांचा मान राखत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

या निर्णयानुसार आता या प्रभागातून मनसेचा उमेदवार निलेश शिरथनकर निवडणूक लढवणार असून, त्यांना शशिकांत पवार पूर्ण सहकार्य करतील, असे जाहीर करण्यात आले आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

शशिकांत पवार हे प्रभागातील परिचित स्थानिक कार्यकर्ते असून ते गेली अनेक वर्षे विभागाचे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक, नागरी आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केल्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता होती. त्यामुळे अनेक स्थानिक मतदारांची त्यांना नगरसेवक म्हणून पाहण्याची इच्छा होती.

राजकीय जाणकारांच्या मते, शशिकांत पवार उमेदवार राहिले असते, तर भाजपचे अस्थानिक उमेदवार गौरांग झवेरी यांना चुरशीची लढत मिळाली असती. सध्या दक्षिण मुंबईतील अनेक प्रभागांत अमराठी मतदारांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे या प्रभागतील मराठी मतदारांना एकत्र आणण्याची ताकद शशिकांत पवार यांच्याकडे होती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मनसे उमेदवाराबाबत साशंकता

दुसरीकडे, या प्रभागात मनसेकडून ठोस स्थानिक काम झालेले नसल्यामुळे मनसेचा उमेदवार नीलेश शिरथनकर यांची निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे मत अनेक मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे उमेदवारी बदलाच्या निर्णयामुळे स्थानिक शिवसैनिक आणि समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

दक्षिण मुंबईत ठाकरे बंधूंसाठी आव्हान?

या घडामोडींमुळे केवळ प्रभाग २१७च नव्हे, तर संपूर्ण दक्षिण मुंबईतील काही प्रभाग ठाकरे बंधूंच्या हातून निसटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेना–मनसे आघाडीच्या वतीने भाजपला रोखण्यासाठी उभे करण्यात आलेले अनेक उमेदवार स्थानिक पातळीवर अपरिचित आणि अनुभवहीन असल्यामुळे भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे जागावाटपात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या स्थानिक, निष्ठावान पदाधिकाऱ्यांना डावलून असक्षम उमेदवार देण्यात आल्याने उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे. ही नाराजी येत्या काळात बंडखोरीत रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २१७ मधील ही घडामोड ठाकरे गटासाठी चिंताजनक मानली जात असून, याचा परिणाम संपूर्ण दक्षिण मुंबईतील निवडणूक समीकरणांवर होण्याची दाट शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button