महाराष्ट्र
Trending

ठाकरे बंधूंची ‘गुप्त बैठक’, कार्यकर्त्यांच्या बंडाने वाढवली डोकेदुखी?

राज्यातील विविध महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आज (गुरुवारी) भेट घेतली. यापूर्वी दोन दिवस आधी राज ठाकरे ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटींमुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय जवळिकीला पुन्हा एकदा धार आल्याचे मानले जात आहे. पक्षाचा जाहीरनामा, संयुक्त रॅली आणि कार्यकर्त्यांच्या बंडखोरीवर महत्त्वाची चर्चा करण्यासाठी ही गुप्त बैठक झाली असावी अशी चर्चा आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी हातमिळवणी केल्यामुळे राजकीय रणांगण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. दरम्यान, निवडणूक जिंकण्यासाठी विविध मनसुबे आणि आगामी योजना आखण्यासाठी ठाकरे बंधूंची भेटीगाठी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीची रणनीती, संयुक्त प्रचार आणि जाहीरनाम्यावर सविस्तर चर्चा झाली.

बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक नगरपालिकांतील वॉर्डांमध्ये अधिकृत उमेदवारांविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारल्याने निर्माण झालेल्या संघटनात्मक अडचणींवरही या बैठकीत चर्चा झाली. बंडखोरीमुळे निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम होत असल्याने त्यावर तोडगा काढण्याची रणनीती आखण्यात आली.

दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रात संयुक्त प्रचार सभा घेण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे संयुक्त निवडणूक जाहीरनाम्याला अंतिम स्वरूप देत आहेत. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी ठाकरे बंधू संयुक्त रॅलीतून मतदारांना संबोधित करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button