
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. आयकर विभागाने मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे. ही कारवाई त्यांच्या ‘बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी’ कंपनीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर
मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॅस्टियन हॉस्पिटॅलिटीची सहमालक आहे. या कंपनीचे मुंबई, पुणे, बंगळुरू आणि गोवा येथे ‘Bastian’ नावाने क्लब्स आणि रेस्टॉरंट्स चालतात. आयकर विभागाला हॉटेल व्यवसायातील गुंतवणूक, उत्पन्न आणि कर भरण्यात अनियमितता झाल्याचा संशय आहे. त्यामुळे बॅस्टियन रेस्टॉरंटशी संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी छापे
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने बॅस्टियन कंपनीचे आउटलेट्स तसेच कंपनीच्या प्रमोटर्सच्या घरांवरही छापे टाकले आहेत. ही छापेमारी बुधवारी सुरू झाली असून, त्यानंतर तपासाचा फेरा थेट शिल्पा शेट्टीच्या घरापर्यंत पोहोचला आहे.
शिल्पा शेट्टीचा यात काय संबंध?
बॅस्टियन पबची सुरुवात उद्योगपती रंजीत बिंद्रा यांच्या बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी कंपनीने केली होती. शिल्पा शेट्टीने 2019 मध्ये या कंपनीत 50 टक्के हिस्सेदारी खरेदी केली, ज्यामुळे ती या पबची सह मालकीण झाली. सध्या आयकर विभागाकडून कागदपत्रांची तपासणी आणि आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण सुरू आहे. या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे बॉलिवूडसह व्यावसायिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आरोपांवर शिल्पा शेट्टींचे स्पष्टीकरण
या प्रकरणावर यापूर्वीच शिल्पा शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी आयकर विभागाच्या आरोपांना बेबुनियाद ठरवत म्हटले होते, “आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्याय मिळेल, याचा पूर्ण विश्वास आहे. देशातील कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने माध्यमांनी संयम बाळगावा,” असे आवाहन तिने केले होते.
