शहर
Trending

BMC Election 2026: “मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार”- नवाब मलिक

पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी, “१६ जानेवारीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दिसून येईल आणि महापौर पद आमच्याच उमेदवाराला मिळेल अशी ग्वाही दिली, तसेच त्यांनी उमेदवारांच्या निवडीत विविध समाज, महिलांवर आणि व्यावसायिकांवर भर देऊन स्वबळावर लढण्याचा विश्वास व्यक्त केला.

मुंबई: माजी मंत्री आणि मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १६ जानेवारीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दिसून येईल आणि मुंबईत महापौर पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळेल.

साडे तीन वर्षांनंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या तयारीची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईतील ९४ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले असून ९५व्या जागेवरील उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. धारावी आणि रमाबाई आंबेडकरनगर–कामराजनगरसह दोन ठिकाणी पुरस्कृत उमेदवारही आहेत.

नवाब मलिक म्हणाले, “आमच्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, भाजी विक्रेते, सफाई कामगार यांच्यासह प्रत्येक समाज घटकाचा समावेश केला आहे. मराठी भाषिक तसेच मुंबईला कर्मभूमी मानणाऱ्या भूमीपुत्रांना संधी दिली आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि तेलगू भाषिकांचेही प्रतिनिधित्व केले आहे.”

निवडणूक प्रक्रियेवरही नवाब मलिकांनी संशय व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, काही उमेदवारांची पात्रता नियमावलीच्या उलट असूनही उमेदवारी मंजूर करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, १५१ नंबर वॉर्डमधील उमेदवार राखीव जागेसाठी अर्जदार असून त्याच्याकडे जाति दाखला नाही. तसेच, ११९ वॉर्डमधील उमेदवार महानगरपालिकेचा वेंडर असूनही निवडणूक लढवत आहे. नवाब मलिक म्हणाले की, याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल आणि कोर्टातही प्रकरण जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून युतीशिवाय स्वबळावर निवडणूक लढवण्याचे समर्थन केले, त्याबद्दल नवाब मलिक यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

निवडणुकीत विविध प्रभागात भाजप, शिंदे सेना आणि काँग्रेसविरोधात लढत असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. “आम्ही एका पक्षाविरुद्ध नाही; आमच्या उमेदवाराच्या विजयासाठी लढत आहोत. काही जागा भाजपविरोधात, काही ठिकाणी शिंदे सेनेविरोधात जिंकण्याचा आमचा विश्वास आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी नवाब मलिक म्हणाले, “गुन्हेगार आणि शिक्षा भिन्न गोष्टी आहेत. शिक्षा झाल्यासच उमेदवार निवडणूक लढवू शकत नाही, अन्यथा कोणीही निवडणूक लढवण्यापासून रोखले जाऊ शकत नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button