
नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका केमिकल कारखान्याला गुरुवारी रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ऐन रात्री लागलेल्या या आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि दाट काळ्या धुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नवी मुंबई: रात्री साडेनऊच्या सुमारास लागलेली ही आग पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कारखान्यात विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांचे उत्पादन अथवा साठवणूक केली जात होती. त्यामुळे आग वेगाने पसरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आग लागण्याचे कारण
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक बी–४२ वरील विघ्नहर्ता कंपनीमध्ये अगरबत्ती निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांची सुमारे १५० पिंपे साठवण्यात आली होती. या पिंपांमधील सॉल्व्हन्ट रसायनांनी अचानक पेट घेतल्याने भीषण स्फोट झाले आणि आगीने उग्र स्वरूप धारण केले. स्फोटाच्या तीव्रतेमुळे कारखान्यातील लोखंडी पत्रे तुटून थेट रस्त्यावर कोसळली. उडालेल्या रसायनांमुळे कंपनीसमोरील रस्ता व गटारांमधून आग पसरत गेली आणि लगतच्या आणखी बी – ४१ आणि बी – ४३ या दोन कारखान्यांनाही तिचा फटका बसला.
आगीचे लोण वाढत असल्याचे लक्षात येताच कारखान्यातील कामगारांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बाहेर पळ काढला आणि आपले प्राण वाचवले. तळोजा एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी रत्नाकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा दहा वाजता आगीची माहिती मिळताच वाहतूक कोंडी असूनही अवघ्या पाच मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता पाहता अतिरिक्त बंब मागवण्यात आले.
पहाटेपर्यंत सतत पाणी व फोमचा मारा करून अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र, रसायनांनी पेट घेतल्यामुळे आग अधिक पसरली असली तरी तिचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्था व रसायन साठवणीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि औद्योगिक सुरक्षा विभागानेही घटनास्थळी धाव घेतली आहे. आग आटोक्यात आल्यानंतर सविस्तर चौकशी करण्यात येणार असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा नियम अधिक कडक करण्याचा विचार केला जात आहे.
तळोजा औद्योगिक वसाहत ही नवी मुंबईतील एक महत्त्वाची औद्योगिक पट्टी असल्याने, या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आग पूर्णपणे विझल्यानंतर नुकसानाचा अहवाल आणि चौकशीचे निष्कर्ष प्रशासनाकडून जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.



