
झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आणि ॲमेझॉनसह प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी 31 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. यामुळे नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये अडथळा येऊ शकतो.
नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही ऑनलाइन ऑर्डरवर निर्भर आहात का? तर तुमची निराशा होण्याची दाट शक्यता आहे. कारण आज म्हणजेच 31 डिसेंबरला झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आणि ॲमेझॉनसह देशातील प्रमुख ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर देशव्यापी डिलिव्हरी संप होणार आहे. यामुळे घरपोच जेवणापासून ते शेवटच्या क्षणीच्या खरेदीपर्यंत सर्व काही प्रभावित होऊ शकते.
हा संप तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन (TGPWU) आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स (IFAT) करणार आहेत. ज्याला महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली-एनसीआर, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील कामगार संघटनांचा यात पाठिंबा आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
कामगारांचा असा दावा आहे की गिग इकॉनॉमीतील कामाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. फास्ट डिलिव्हरीची मागणी असूनही पगार, सुरक्षितता आणि कामाच्या स्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही. कामगारांच्या तक्रारींवर कंपन्या प्रतिकूल प्रतिक्रिया देतात, ब्लॉकिंग, भीती निर्माण करणे आणि अल्गोरिदमद्वारे शिक्षा देणे यासारखे प्रकार केले जात आहेत.
यापूर्वी देखील हा संप करण्यात आला होता. 25 डिसेंबरला झालेल्या संपात 40 हजारांहून अधिक डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामुळे अनेक शहरांमध्ये 60% डिलिव्हरी प्रभावित झाली होती. त्यामुळे आज 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी, जेव्हा देशभरातील करोडो नागरिक ऑनलाइन फूड ऑर्डरवर निर्भर असतील, तेव्हा त्यांच्यावर या संपाचा मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे.
पुणे, मुंबईत संपाचा प्रभाव
या संपाचा खास करून पुणे, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि इतर प्रमुख शहरांमध्ये याचा परिणाम दिसून येईल. मुंबईतही काही ठिकाणी सौम्य प्रभाव दिसून येईल. त्यामुळे जर तुम्ही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन होम डिलिव्हरीवर अवलंबून ठेवलं असेल, तर आता पर्यायी योजना आखणे गरजेचे आहे.



