
भायंदर पूर्व भागात अचानक बिबट्या दिसल्याने लोकं घराबाहेर पडण्यास घाबरत असून, काहींनी लहान मुलांना शाळेत पाठवणेही बंद केले आहे. स्थानिकांनी सांगितले की, बिबट्याने काही लोकांच्या अंगावर हल्ला केला आणि त्यात सहाजण जखमी झाले.
मुंबई : मुंबईतील दाट वस्ती असलेल्या भायंदर पूर्व भागात सायंकाळी बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. ज्यामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याने काही लोकांवर हल्ला देखील केला, ज्यात सहा जण जखमी झाले आहेत. ज्यांना स्थानिक सरकारी रुग्णालयात तातडीने नेण्यात आले.
भायंदर पूर्व भागात आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक बिबट्या दिसल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला. स्थानिकांनी सांगितले की, बिबट्याने लोकवस्तीत घुसून काहींच्या अंगावर हल्ला केला आणि त्यात अनेकजण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या टीमने तातडीने मोहीम सुरू केली.
ठाणे प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक सचिन रेपाल यांनी या घटनेची दुजोरा देत सांगितले की, विभागाला या प्राण्याच्या उपस्थितीचे वृत्त मिळाले होते आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी बचाव पथक पाठवले. वन विभागाला मदत करण्यासाठी SARRP- इंडिया या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक देखील घटनास्थळी पोहोचली होती. झाडे, झुडपे आणि घरांभोवती नजर ठेवून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. काही तासांच्या कठोर प्रयत्नानंतर बिबट्याला जाळ्यात अडकवून सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे.
रहिवाशांची प्रतिक्रिया
वन विभागाला बिबट्याला पकडण्यास यश जरी आले असले तरी स्थानिकांनी प्रशासनाकडे भविष्यातील सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात बिबट्यांचा वावर वाढत चालला आहे. जी चिंताजनक बाब आहे. त्यामुळे वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि झुडपांजवळ, उद्यानांजवळ लहान मुलांना एकटे सोडू नये असे निर्देश दिले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने परिसरात निरंतर पाहणी आणि सुरक्षा उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.



