क्रीडा

रोहित शर्मा मुंबई संघातून गट टप्प्यात बाहेर! MCA ने दिले स्पष्टीकरण

बीसीसीआयने सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी खेळण्याचे निर्देश दिले असले, तरी सध्या रोहित शर्मा उपलब्ध नसल्यामुळे त्याचा समावेश मुंबईच्या संघात करण्यात आलेला नाही.

मुंबई: विजय हजारे ट्रॉफीचा गट टप्पा २४ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत मुंबई संघाचा समावेश एलिट गट सी मध्ये झाला असून, या गटात सिक्कीम, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि गोवा या संघांचा समावेश आहे. मुंबईचे सर्व गट टप्प्यातील सामने जयपूर येथे खेळवले जातील.

दरम्यान, मुंबईसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात रोहित शर्माचे नाव नाही यामुळे चाहत्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयने सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी खेळण्याचे निर्देश दिले असले, तरी रोहित शर्मा सध्या उपलब्ध नसल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे स्पष्टिकरण

एमसीएच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, “रोहित शर्मा आणि इतर भारतीय संघातील खेळाडू जेव्हा उपलब्ध होतील, तेव्हा त्यांचा संघात समावेश करण्यात येईल. सध्या ते उपलब्ध नसताना संघात नाव देणे योग्य ठरणार नाही. संघात खेळताना कोणत्याही युवा खेळाडूचा फायदा कमी होऊ नये, म्हणून सध्या जागा देण्यात आलेली नाही.”

त्यांनी पुढे सांगितले की, “हे सर्व आंतरराष्ट्रीय किंवा अनुभवी खेळाडू विजय हजारे ट्रॉफीपासून मुकलेले नाहीत. ते जेव्हा उपलब्ध होतील, तेव्हा संघात सामील होतील.”

युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न

मुंबई संघातील निवड यादीमध्ये माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, तसेच सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश नाही. मात्र, या खेळाडूंचा पुढील राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील सामने खेळण्यावर याचा परिणाम होणार नाही. सध्या संघात स्थान मिळालेल्या खेळाडूंपैकी काही युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी अनुभवी खेळाडूंना संघातून दूर ठेवण्यात आले आहे. यामुळे नवोदित खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी निर्माण होणार आहे.

असे असले तरी, रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये केव्हा आणि कोणत्या सामन्यापासून खेळताना दिसेल, याबाबत चाहत्यांना सर्वात जास्त उत्सुकता लागली आहे. मुंबई संघासाठी गट टप्प्यातील सामने जयपूर येथे २४ डिसेंबरपासून सुरू होणार असून, संघातील युवा आणि अनुभवी खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी क्रीडा प्रेमी देखील उत्सुक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button